पुढील 4 दिवस मोठ्या पावसाचा इशारा, प्रशासन अलर्ट मोडवर, पुढील 24 तास धोक्याचे

Foto
 पुणे : राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसतोय. देशातील मॉन्सूनचे ढग दूर गेले आहेत. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात पाऊस पडतोय. ऐन दिवाळीच्या तोंडावरही अनेक भागात पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आता 20, 21, 22, 23, 24 आणि 25 ऑक्टोबर दरम्यान पावसाचा इशारा दिला. नवरात्रीनंतर दिवाळी देखील पावसामध्येच जाण्याचे संकेत आहेत. राज्यामध्ये काही दिवसांपूर्वीच पावसाने मोठा हाहाकार माजवला. अनेक भागात इतका पाऊस झाला की, शेती पूर्णपणे वाहून गेली. हाताला आलेले पिक शेतकऱ्यांच्या हातून निघून गेले.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील सात दिवसांत केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचे संकेत आहेत. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला. पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि लातूर या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण भारतातील अनेक भागात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. 21ऑक्टोबरपर्यंत, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल येथे हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. पुढील काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिक वाढण्याचे स्पष्ट संकेत भारतीय हवामान विभागाने दिली आहेत. 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान छत्तीसगडमध्ये आणि 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचे संकेत आहेत.

पुढील तीन दिवसांत कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे संकेत आहेत. यामुळे राज्यावरील पावसाचे संकट अजूनही टळले नसल्याचे स्पष्ट आहे. अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. 24 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पुढील काही दिवस पावसाचे ढग असणार हे आता स्पष्ट आहे. भर दिवाळीतही लोकांना छत्र्या घेऊन फिरावे लागेल.